कमजोर पाकिस्तानने रोखला भारतीय संघाचा विजयरथ, आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला हरवलं

कमजोर पाकिस्तानने रोखला भारतीय संघाचा विजयरथ, आशिया चषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला हरवलं

सिल्हेट : महिला आशिया चषक २०२२ मधील १३वा सामना भारतीय महिला विरुद्ध पाकिस्तान महिला संघात पार पडला. आज पार पडलेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने १३ धावांनी विजय मिळवला. या स्पर्धेत भारतीय संघाला पहिला पराभव पत्करावा लागला. यापू्र्वी खेळलेल्या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला होता. या पराभवामुळे आता भारताचे गुणतालिकेतील स्थान धोक्यात आले आहे.

विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या संघाने आशिया चषकात प्रथमच भारताविरुद्ध सामना जिंकला आहे. यापूर्वी खेळले गेलेल्या सर्व सामन्यात पाकिस्तानच्या पदरात निराशा पडली आहे. या सामन्यात पाकिस्तान महिला संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय पाकिस्तानी फलंदाजांनी योग्य असल्याचे सिद्ध करत निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १३७ धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाला सर्वबाद १२४ धावाच करता आल्या, त्यामुळे पाकिस्तानने १३ धावांनी विजय मिळवला.

महिला आशिया चषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान १२ वेळा आमने-सामने आले आहेत. यातील भारताने ११ सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने आज पहिल्या विजयाची नोंद केली आहे. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानची भारताविरुद्धची कामगिरी अतिशय खराब आहे. परंतु, कर्णधार बिस्माह मारुफच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या संघाने भारताविरुद्ध पहिल्या विजयाची नोंद केली आहे.

आशिया चषक २०२२ मधील भारताचा पहिला पराभव आशिया

आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारताने गट सामन्यात सलग तीन सामने जिंकले होते. विजयरथावर स्वार झालेल्या भारतीय संघाला पाकिस्तानला पराभूत करुन स्पर्धेतील सलग चौथा विजय नोंदवून उपांत्य फेरीत स्थान पक्क करायचं होतं. पण पाकिस्तानच्या संघाने भारताच्या आशेवर पाणी फेरलं.

पाकिस्तानने भारतीय संघाला पराभूत करत गुणतालिकेतील आपला रनरेट मजबूत केला. या विजयानंतर पाकिस्तानने ४ पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच, भारतानेही ४ पैकी १ सामना गमावत ३ सामन्यात विजय मिळवला आहे. भारत गुणतालिकेत अव्वलस्थानी असून त्यांचे ६ गुण आहेत. तसेच, भारताचा नेट रनरेट २.४८० इतका आहे. तर पाकिस्तान ६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे आणि त्यांचा नेट रनरेट १.६८४ इतका आहे.