वैद्यकीय विज्ञानाची झेप

वैद्यकीय विज्ञानाची झेप

डॉ. आनंद जोशी

१९४७ मध्ये भारतात सरासरी आयुर्मान ३२ वर्षे होते. आज २०२२ मध्ये सरासरी आयुर्मान ७० वर्षे झाले आहे. म्हणजे गेल्या ७५ वर्षांत ते दुपटीपेक्षा जास्त झाले आहे. त्यामध्ये आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचे महत्त्वाचे योगदान आहे.

स्वातंत्र्य मिळाले त्याला ७५ वर्षे झाली. यात आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचा सहभाग काय असावा, याबाबत विचार करीत होतो. नजर जरा बाहेर टाकली. पावसाची सर येऊन गेली होती. उन्हे कलली होती. अशा संध्याकाळच्या वेळी बगीच्यात जाणारे हसणारे गप्पा मारणारे, जेष्ठ नागरिकांचे समूह दिसले. गेल्या अर्धशतकाच्या वैद्यकीय व्यवसायात जेष्ठ नागरिकांचे प्रमाण वाढते आहे, हेही अनुभवत होतो; पण याला आकडेवारी काय, म्हणून शोध घेतला. १९४७ मध्ये भारतात सरासरी आयुर्मान ३२ वर्षे होते. आज २०२२ मध्ये सरासरी आयुर्मान ७० वर्षे झाले आहे. म्हणजे गेल्या ७५ वर्षांत ते दुपटीपेक्षा जास्त झाले आहे. याला जी कारणे आहेत त्यात आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचे योगदान ठळक कारण आहे. त्याचा विकास कसा झाला, हे पाहणे उद्बोधक ठरेल.

वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णालये

स्वातंत्र्यपूर्व काळात रुग्णालये आणि आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचे शिक्षण या दोन्ही गोष्टी ब्रिटिशांनी भारतात सुरू केल्या. भारतातील अनेक मेडिकल कॉलेजे शंभर ते दीडशे वर्षांपेक्षा जुनी आहेत. ती ब्रिटिशांच्या काळात जरी बांधली गेली असली तरी, बहुतेक मेडिकल कॉलेज दानशूर भारतीयांच्या देणगीतून उभी राहिली आहेत. त्याचप्रमाणे बरीच जुनी रुग्णालये ब्रिटिश सरकारांनी भारतीयांनी भरलेल्या करातून बांधली आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णालये या दोन्ही बाबी भारतीयांसाठी नवीन होत्या; पण त्या त्यांनी स्वीकारल्या आणि त्याचा विकास केला. वैद्यकीय शिक्षणातील मोठा अडसर शवविच्छेदन हा होता. शरीरशास्त्र शिकवायचे, तर त्याला शवविच्छेदनाशिवाय पर्याय नव्हता. भीती, अंधश्रद्धा यावर विजय मिळवल्याशिवाय गत्यंतर नव्हते. वैद्यकीय शिक्षणाबद्दलचे सुप्त आकर्षण, त्यातून मिळणारा आर्थिक लाभ आणि डॉक्टरचे समाजातील स्थान यांमुळे हा अडथळा पार करून भारतीयांनी वैद्यकीय शिक्षणात भाग घेतला. पुढे वैद्यकीय शिक्षणासाठी मृत्यूनंतर शरीरदान करणाऱ्या व्यक्तीही समाजात तयार होऊ लागल्या. संबंध भारतभर कमी-अधिक प्रमाणात वैद्यकीय शिक्षणाचा प्रसार झाला. तयार झालेले डॉक्टर वैद्यकीय शिक्षणात सहभागी झाले. वैद्यकीय विज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये उत्तम शिक्षण देणारे भारतीय शिक्षक-डॉक्टर यांच्यामुळे आधुनिक वैद्यकीय विज्ञानाची झालेली प्रगती आपण पाहत आहोत आणि शहरी भागांत अनुभवत आहोत. सरकारी, महापालिकेची, मेडिकल कॉलेज; तसेच खाजगी, मेडिकल कॉलेज उभी राहू लागली. पुढे आरक्षण आले. गुंतागुंत वाढत गेली. मेडिकलला प्रवेश मिळवण्यासाठीची स्पर्धा खूप वाढली. राज्याराज्यांत प्रवेशपरीक्षा होऊ लागल्या. त्या बंद होऊन संपूर्ण देशभरच्या सगळ्या मेडिकल कॉलेजसाठी एकच परीक्षा सुरू झाली. या माहोलात काही समाधानी, तर काही असमाधानी समूह असे झाले; पण सर्व जमेस धरूनसुद्धा वैद्यकीय शिक्षण सर्व स्तरात पोचण्याचा प्रयोग काही प्रमाणात यशस्वी ठरला.

आता रुग्णालयाचा विस्तार आणि विकास पाहू. सरकारी इस्पितळे, महापालिका, नगरपालिका यांची रुग्णालये सर्वदूर पसरली. मात्र, ग्रामीण भाग, आदिवासींचा भाग मात्र उपेक्षित राहिला. तेथे प्राथमिक आरोग्य केंद्रे होती; पण तेथील वैद्यकीय सोई-सुविधा तुटपुंज्या असल्याने वैद्यकीय सेवा लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील वैद्यकीय सेवा सुविधा यात आजही जमीन अस्मानाचे अंतर आहे.

मुंबईत ब्रिटिशांच्या काळात मोहामेडन, मेमन खोजा, बोहरा, गुजराती बनिया, मारवाडी, भाटिया या जमातींनी स्वत:च्या लोकांसाठी खासगी रुग्णालये काढली. त्याच्यातून आजची मोठी खासगी रुग्णालये मुंबईत उभी राहिली आहेत. त्या जमातीतील दानशूर व्यक्तींनी दिलेल्या निधीमुळे या रुग्णालयाचा विकास गतीने झाला. अद्ययावत उपकरणे, प्रशिक्षित कर्मचारी आणि प्रसिद्ध डॉक्टर या रुग्णालयात असल्यामुळे देशभरातून; तसेच मध्यपूर्व देशातून रुग्ण येथे येऊ लागले. मुंबईतील सरकारी आणि महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमधून तयार झालेले निष्णात डॉक्टर या खासगी रुग्णालयात सेवा देऊ लागले. डॉक्टरनी मुंबई; तसेच इतर छोट्या मोठ्या शहरातून स्वत:ची रुग्णालये, नर्सिंग होम तयार केली. तिथेच कर्मचाऱ्यांना आणि परिचारिकांना आणखी प्रशिक्षित केले. या सगळ्याचा शहरी भागात आधुनिक वैद्यकीय विज्ञानाच्या सेवासुविधा देण्यात अत्यंत महत्त्वाचा सहभाग आहे, हे विसरून चालणार नाही. संपूर्ण भारताचा विचार केला, तर आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचा शहरी लोकांना जसा फायदा झाला, तसा फायदा ग्रामीण जनतेला झाला नाही.

तंत्राचा विकास

भारतात गेल्या ७५ वर्षांत झालेला आधुनिक वैद्यकीय विज्ञानाच्या भौतिक रचनेच्या विकासाचा आढावा घेतला. आता निदानीय संकल्पनांमध्ये, तंत्रज्ञानामध्ये जी प्रगती झाली आहे, त्याकडे बघणे तितकेच अर्थपूर्ण आहे. सुरुवातीला स्टेथोस्कोप, एक्सरे, रक्त, मूत्र, थुंकी वगैरेच्या चाचण्या एवढीच साधन सामग्री निदानासाठी डॉक्टरांकडे होती. ‘अचूक निदान तर अचूक उपचार,’ हे आधुनिक वैद्यकीय विज्ञानातील मूलतत्त्व असते. रोग कोणत्या अवयवात झाला आहे, हे शोधणे ही निदानातील पहिली पायरी ठरते. त्यासाठी ‘ऑपथॅलमोस्कोप’ ते ‘कोलानोस्कोप’पर्यंत विविध ‘स्कोप’ आले. त्यानंतर आली ‘स्कॅनिंग’ उपकरणे, ‘कॅटस्कॅन’, ‘एमआरआय’, ‘पेट’, ‘सोनोग्राफी’ यांसारखे शरीरात ढवळाढवळ न करता, रुग्णाला कमीतकमी त्रास होईल असे हे ‘स्कॅन’, यांनी निदान सुलभ केले. त्याला जोड मिळाली ‘अँजिओग्राफी’ तंत्राची. यामुळे आधुनिक वैद्यकीय प्रगतीला भलताच वेग आला. विविध उपचार सुरू झाल्यामुळे ‘कार्डियालॉजी’, ‘न्यूरॉलॉजी’ अशा अनेक सुपरस्पेशालिटी सुरू झाल्या. या सगळ्या गोष्टी पाश्चात्य देशात निर्माण झाल्या. त्या भारतात यायला अजिबात वेळ लागला नाही. याबरोबरच विविध ‘अँटिबायोटिक्स’ आली, त्याला जोड मिळाली विविध लसीकरणाची, स्वच्छ पाणीपुरवठा आणि सांडपाण्याचा योग्य निचरा याची. यामुळे जीवाणू-विषाणूचे रोग कमी झाले. आज वाढलेले सरासरी आयुर्मान या सगळ्याचा परिपाक आहे.

त्रुटींचे भान

त्रुटींचे भान असणे, हा भावी विकासाचा पाया असतो. ७५ वर्षांचा हा उत्साह साजरा करीत असताना आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींचा आढावा घेणे योग्य ठरेल. आज आधुनिक वैद्यकीय विज्ञानाच्या प्रगतीचा फायदा भारतीयांना झालेला असला तरी, या विज्ञानशाखेत जागतिक स्तरावर ठसा उमटवेल, असे संशोधन भारतात झालेले नाही. मलेरिया, डेंगी हे इथले रोग; पण त्यांच्यावर संशोधन पाश्च्यात्य देशात होत आहे. क्षयरोग आणि औषधांना दाद न देणारा क्षयरोग आजही भारतात नियंत्रणात आलेला नाही. यावर संशोधन भारतात होत आहे; पण मिळावे तसे यश अजून मिळालेले नाही. रुग्णांपर्यंत क्षयरोगावरील उपचार पोचवण्यात आरोग्यव्यवस्था कोठे तरी कमी पडत आहे. ग्रामीण; तसेच आदिवासी भागात आरोग्यव्यवस्था योग्य प्रकारे पोहोचत नाहीत, याची कारणे आधुनिक वैद्यकीय विज्ञानात नसून, पायाभूत सुविधांच्या अभावात आहेत. आरोग्याचा फायदा सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर रस्ते, वीज, नळावाटे मिळणारे शुद्ध पिण्याचे पाणी आणि सांडपाण्याचा योग्य निचरा याची गरज असते. पुढील २५ वर्षांत या सुविधा मिळतील अशी आशा करू या.

दारिद्र्य आणि आरोग्य

गरिबीचा मेंदूवर किती गंभीर परिणाम होतो याचा मेंदूतज्ज्ञांनी केलेला अभ्यास नोबेलविजेते दाम्पत्य अभिजित बॅनर्जी आणि इस्थर डफलो यांच्या ‘पुअर इकॉनॉमिक्स’ या पुस्तकात दिला आहे. गरिबांमध्ये औदासिन्य आणि तणाव यांचे प्रमाण खूप असते. त्यामुळे त्यांच्या रक्तातील ‘कॉरटिसॉल’ या ‘स्टिरॉइड हॉर्मोन’चे प्रमाण अतोनात वाढते. या वाढलेल्या ‘कॉरटिसॉल’चा परिणाम मेंदूतील महत्त्वाच्या केंद्रांवर होतो. यामुळे गरीब माणसाची बोधनक्षमता कमी होते. आवेगी आणि अविचारी वर्तनाची शक्यता वाढते. गरिबीचे परिणाम संबंध कुटुंबावर होतात. पिढ्यानपिढ्या जे गरिबीत अडकले असतील त्यांच्या मेंदूवर होणारे आघात त्यांचे वर्तन घडवत असतात. शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता, अशा अनेक घटना गरिबीच्या मेंदूवरील परिणामांमुळे घडतात. ‘कॉर्टिसॉल’च्या रक्तात वाढलेल्या प्रमाणामुळे गरीब माणसाची रोगप्रतिकारकशक्ती खालावते आणि गरीब माणूस रोगाला; तसेच साथीला पहिल्यांदा बळी पडतो. नुकत्याच झालेल्या साथरोगाच्या काळात हेच घडले आहे. गरिबी हा नुसता आर्थिक प्रश्न नसून, तो सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्न आहे याचे भान ठेवून पुढची वाटचाल करावयाची आहे. त्याची सुरुवात अमृतमहोत्सवात होणे जरुरीचे आहे.