World Vegetarian Day :नॉनव्हेजची गरज काय? या 6 भाज्या प्रोटिनचं भांडार, हाडं व सांध्यांना धक्का लागू देणार नाहीत

World Vegetarian Day :नॉनव्हेजची गरज काय? या 6 भाज्या प्रोटिनचं भांडार, हाडं व सांध्यांना धक्का लागू देणार नाहीत

दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी जागतिक शाकाहारी दिवस (World vegetarian day 2022) साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात 1977 मध्ये नॉर्थ अमेरिकन व्हेजिटेरियन सोसायटीने केली, ज्याला नंतर आंतरराष्ट्रीय शाकाहारी संघाचाही पाठिंबा मिळाला. हा दिवस पर्यावरण, आरोग्य आणि मानवी फायद्यांबद्दल जागरूकता पसरवण्याचे काम करतो. एका रिपोर्टनुसार, जगाच्या लोकसंख्येपैकी 22% लोक स्वतःला शाकाहारी म्हणवतात. साहजिकच हा आकडा मोठा आहे. अनेकदा शाकाहारी पदार्थ म्हणजे हिरव्या भाज्या या कायमच मांसाहाराच्या (non veg food) तुलनेत कमी चवदार आणि कमकुवत मानले जातात. मांसाहारामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेल्या काही पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते हे खरे आहे, पण शाकाहारी अन्न खाल्ल्लयानेही तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य मिळू शकते हे देखील तितकेच खरे आहे.

आता शरीरासाठी सर्वात महत्वाच्या पोषक प्रोटीनबद्दल बोलूया. असे मानले जाते की बहुतेक प्रथिने मांसाहारी अन्न जसे की चिकन, अंडी किंवा लाल मांसमध्ये आढळतात. जर आपण हाय प्रोटीन असलेल्या शाकाहारी पदार्थांबद्दल बोललो तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही शाकाहारी अन्नपदार्थ हे प्रोटीनचे भांडार असतात. बीन्स, हरभरा, पनीर, मसूर यांसारख्या गोष्टी प्रथिनांचा खजिना आहेत. पण त्याव्यतिरिक्त अजून कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊया.

मका किंवा कणीस (Corn)

भारतात मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या धान्याचा वापर विविध पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. जर्नल ऑफ न्यूट्रिशननुसार, प्रत्येक 100 ग्रॅम मक्यामध्ये 3.3 ग्रॅम प्रोटीन असते, जे तुमचे स्नायू तयार करण्याचे काम करते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यात फॅट आणि कोलेस्ट्रॉल नसते. तुम्ही कॉर्न उकळून, भाजून किंवा इतर कोणत्याही पदार्थामध्ये घालून खाऊ शकता.

हिरवे वाटाणे

हिरव्या वाटाण्यांची भाजी हिवाळ्यात चांगली विकली जाते आणि त्याचे देशात चांगले उत्पादन होते. वाटाण्याचे छोटे छोटे हिरवे दाणे हे प्रथिनासारख्या अनेक पोषक तत्वांचे भांडार आहेत. वाटाण्यांच्या एका पूर्ण कपमध्ये सुमारे 9 ग्रॅम प्रोटीन असतात. याव्यतिरिक्त, ते जीवनसत्त्वे ए, के आणि सी ने समृध्द असतात आणि त्यात अनेक खनिजे आणि उच्च प्रमाणात फायबर देखील असतात.

चणे

चणे आयर्न, कॅल्शियम आणि प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. हॉपकिन्स मेडिसिनच्या (hopkins medicines) रिपोर्टनुसार, 1/2 कप चण्यांमध्ये सुमारे 7.3 ग्रॅम प्रोटीन आढळते. इतकंच नाही तर चणे तुमच्या दैनंदिन गरजेच्या 40% फायबर, 70% फॉलेट आणि 22% आयर्न देखील पुरवतात. याव्यतिरिक्त, त्यांच्यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असतो. याचा अर्थ असा आहे की तुमचे शरीर चणे हे हळूहळू पचवते, ज्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरलेले वाटते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

राजमा

राजमामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. राजमा व भात हा भारतीयांचा आवडता पदार्थ आहे. हे स्वादिष्ट असण्यासोबतच पौष्टिक अन्न सुद्धा आहे. राजमा उकळूनही खाऊ शकता. तुम्हाला प्रति १/२ कप राजमामधून 7.5 ग्रॅम प्रोटिन्स मिळतात.

डाळ

तूर, उडीद किंवा मूग डाळ असल्याशिवाय भारतीय जेवण पूर्णच करू शकत नाहीत. जवळजवळ प्रत्येक जेवणाचा एक भाग असणा-या डाळी हे प्रथिने, फायबर आणि आवश्यक खनिजांचे सेवन वाढवण्याचा एक सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. पूर्ण जेवणासाठी भात किंवा चपातीसोबत आपण डाळ खाऊ शकतो. lentils.org नुसार, डाळीमधील प्रोटिनच्या प्रमाणाबद्दल बोलायचे झाले तर 9 ग्रॅम प्रोटिन्स फक्त 1/2 कपमध्ये आढळतात.

पनीर

शाकाहारी लोकांसाठी पनीर हे चिकनसमान आहे. प्रथिने तुम्हाला कॅल्शियमची चांगली मात्रा देखील प्रदान करते, तुमचे पोट जास्त काळ भरलेले ठेवते आणि अधिक चरबी जाळण्यास मदत करते. पनीर कच्चे आणि भाजीच्या स्वरूपात शिजवूनही खाता येते. १/२ कप पनीरमध्ये १४ ग्रॅम प्रोटिन्स आढळतात.