Women’s Asia Cup T20 : रॉड्रिग्ज ठरली स्टार, भारतीय महिला संघाची विजयी सुरूवात

Women’s Asia Cup T20 : रॉड्रिग्ज ठरली स्टार, भारतीय महिला संघाची विजयी सुरूवात

Women’s Asia Cup T20 2022 INDW vs SLW : भारताने महिला आशिया कप 2022 स्पर्धेतील आपला पहिला श्रीलंकेविरूद्धचा सामना 41 धावांनी जिंकत विजयी सुरूवात केली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. भारताने 20 षटकात 6 बाद 150 धावा केल्या. भारताकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. भारताच्या 150 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचे संपूर्ण डाव 18.2 षटकात 109 धावात संपला. भारताकडून हेमलताने 3 आणि पूजा वस्त्रकार आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

भारताची सलामीवीर शेफाली वर्मा (10) आणि स्मृती मानधना (6) स्वस्तात माघारी गेल्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर तिसऱ्या विकेटसाठी 92 धावांची दमदार भागीदारी रचली. जेमिमाह रॉड्रिग्जने 143.40 च्या सरासरीने 53 चेंडूत 11 चौकारांच्या सहाय्याने 76 धावा केल्या. तर हरमनप्रीतने 30 चेंडूत 33 धावांची खेळी केली. या दोघी बाद झाल्यानंतर हेमलताने नाबाद 13 आणि रिचा घोषने 9 धावांचे योगदान देत भारताला 149 धावांपर्यंत पोहचवले.

भारताचे 150 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची भारतीय गोलंदाजीसमोर दाणादाण उडाली. भारताने श्रीलंकेचा निम्मा संघ पहिल्या 10 षटकात 61 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवला. श्रीलंकेकडून हर्षिता माधवी (26), हसिनी परेरा (30) आणि ओशाडी रनसिंगे (11) या तीन फलंदाजांनीच दुहेरी आकडा पार करता आला. भारताकडून हेमलताने 3 तर दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकारने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.