Russian Ukrain War: रशियाने चार प्रदेश बळकावल्यानंतर युक्रेनचा NATO सदस्यत्वासाठी अर्ज

Russian Ukrain War: रशियाने चार प्रदेश बळकावल्यानंतर युक्रेनचा NATO सदस्यत्वासाठी अर्ज

Russian Ukrain War: रशियाने अनेक प्रदेश विलीन केल्यानंतर युक्रेनने अधिकृतपणे नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे. युक्रेनच्या माध्यमांनी शुक्रवारी ही माहिती दिली. युक्रेनने हे पाऊल अशा वेळी उचलले आहे जेव्हा पुतिन यांनी युक्रेनचा मोठा भूभाग रशियात विलीन करण्यासाठी करारांवर स्वाक्षरी केली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय कायद्यांना बगल देत युक्रेनचे चार भाग रशियाला जोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी करारांवर स्वाक्षरी केली. पुतीन यांच्या या निर्णयानंतर लगेचच युक्रेनने नाटो सदस्यत्वासाठी अधिकृतपणे अर्ज केल्याचे जाहीर केले.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की त्यांचा देश नाटो लष्करी युतीमध्ये सामील होण्यासाठी त्वरित अर्ज सादर करत आहे.नाटोमध्ये सामील होण्यासाठी युक्रेनच्या अर्जावर तात्काळ स्वाक्षरी करून आम्ही आमचे निर्णायक पाऊल उचलत असल्याचे ते म्हणाले आहेत. NATO मध्ये सामील होण्यासाठी त्याच्या सर्व सदस्य देशांचे एकमताने समर्थन आवश्यक असते.

या वर्षी जून 2022 मध्ये, तिन देशांनी NATO मध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. या देशांमध्ये बोस्निया आणि हर्जेगोविना, जॉर्जिया आणि युक्रेनचा समावेश आहे. युक्रेनने आता अधिकृतपणे यासाठी अर्ज केला आहे. त्यानंतर जुलै 2022 मध्ये, NATO ने फिनलंड आणि स्वीडनला संघटनेत सामील होण्यासाठी आमंत्रित केले. या दोन देशांसाठी सध्या समर्थन प्रक्रिया सुरू आहे.

नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) म्हणजे काय?

नाटो ही 30 पाश्चात्य देशांची लष्करी आघाडी आहे. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स हे प्रमुख देश सामील आहेत. सुरक्षा धोरणावर काम करणे हे नाटोचे मुख्य उद्दिष्ट आहे आणि इतर कोणत्याही देशाने नाटो देशावर हल्ला केल्यास नाटोमध्ये सहभागी असलेले सर्व देश त्या देशाच्या बाजूने उभे राहू शकतात अशा परिस्थितीत युक्रेनला नाटोचे सदस्यत्व मिळाल्यास रशियाचे युध्द हे फक्त युक्रेनशीच नव्हे तर युक्रेनला शस्त्रे पुरवणाऱ्या अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांशी असणार आहे.

1949 मध्ये, नाटोमध्ये 12 संस्थापक सदस्य होते, ज्यात बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, आइसलँड, इटली, लक्झेंबर्ग, नेदरलँड, नॉर्वे, पोर्तुगाल, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स यांचा समावेश होता. आता ग्रीस आणि तुर्की (1952), जर्मनी (1955), स्पेन (1982), झेक प्रजासत्ताक, हंगेरी आणि पोलंड (1999), बल्गेरिया, एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि स्लोव्हेनिया (2004) , अल्बानिया आणि क्रोएशिया (2009), मॉन्टेनेग्रो (2017) आणि उत्तर मॅसेडोनिया (2020) या देशांचा देखील समावेश आहे.

दरम्यान क्रेमलिनच्या सेंट जॉर्ज हॉलमध्ये, पुतिन आणि युक्रेनच्या चार प्रदेशांच्या प्रमुखांनी रशियामध्ये प्रवेश करण्याच्या कराराच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. यामुळे युक्रेनमध्ये सात महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध अधिक तीव्र होण्याची अपेक्षा आहे. रशियाने युक्रेन-व्याप्त प्रदेशांना जोडण्याबाबत सार्वमत आयोजित केल्यानंतर तीन दिवसांनी हा सोहळा आयोजित करण्यात आला. दरम्यान युक्रेन आणि पाश्चिमात्य देशांनी याला थेट जमीन बळकावणे म्हटले आहे.