Big Boss: ‘तेव्हा मी लाचार होतो म्हणूनच तर बिग बॉस 10 मध्ये गेलो,नाहीतर…’-राहूल देव

Big Boss: ‘तेव्हा मी लाचार होतो म्हणूनच तर बिग बॉस 10 मध्ये गेलो,नाहीतर…’-राहूल देव

Rahul Dev: माणसाला आयुष्य सुरु ठेवण्यासाठी काय-काय करावं लागतं. मग भले जगण्यासाठी चार पैसे कमावण्यासाठी तो जे काम करत आहे ते त्याच्या आवडीचं असो वा नसो. असंच काहीसं अभिनेता राहूल देवसोबत झालं आहे. त्याच्याजवळ जेव्हा काम नव्हतं तेव्हा त्याला काही प्रोजेक्ट्स करण्याचे निर्णय त्याच्या मनाविरोधात जाऊन घ्यावे लागले आहेत. एका मुलाखतीत राहूल देवने आपल्या करिअरमधील चढ-उतारांवर काही खुलासे केले आहेत. तसंच,बिग बॉस १० करण्यापाठी केवळ आपली लाचारी होती असं देखील तो म्हणाला आहे. (Rahul Dev revealed, he did big boss 10 because of lack of work)

राहूल देव एक प्रसिद्ध अभिनेता आहे. २००९ साली त्याची पत्नी रीना देव हिचं कर्करोगानं निधन झालं. मग मुलाचा सांभाळ करण्यासाठी त्यानं सिनेमातून ब्रेक घ्यायचं ठरवलं. त्यादरम्यान त्याच्याकडे काही काम नव्हतं. जेव्हा मुलगा शिक्षणासाठी परदेशी निघून गेला तेव्हा त्यानं मोठ्या पडद्यावर पुर्नरागमन करायचा निर्णय घेतला. हो,पण हे सगळं तितकं सोप्प नव्हतं त्याच्यासाठी. त्याला खूप अडचणींचा सामना करावा लागला. पत्नीच्या मृत्यूनंतर राहूल देव आता अभिनेत्री आणि मॉडेल मुग्धा गोडबोलेला डेट करत आहे. दोघं गेल्या ८ वर्षांपासून एकत्र आहेत.

राहूलनं एका मुलाखतीत म्हटलं आहे, ”मी स्वतःचं फिटनेस सेंटर सुरु केलं. पण ते माझ्यासाठी योग्य ठरलं नाही. ते माझं दुसरं वेंचर होतं. मला त्यात काहीतरी ग्रेट करुन दाखवायचं होतं, पण जमलं नाही. त्यानंतर माझा मुलगा शिक्षणासाठी लंडनला गेला तेव्हा मग मी निर्णय घेतला की आता मी मुंबईत जाऊ शकतो आणि आपल्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करू शकतो. पण काम मिळणं तसं सोप्प राहिलं नव्हतं. मला मनात नसतानाही जवळ काम नव्हतं म्हणून शेवटी बिग बॉस मध्ये भाग घ्यावा लागला. यासाठी मी इतर कुणाला दोष नाही देत आहे. कारण आमचं हे क्षेत्रच असं आहे जिथे सगळं खूप लवकर बदलतं. इथं कामाची शाश्वती देता येत नाही. आणि साडे चार वर्षांचा मी घेतलेला ब्रेक हा तर खूपच मोठा होता. आमच्या क्षेत्रात लोक पटकन विसरतात तुम्हाला”.

राहूल देवनं या मुलाखतीत सिंगल पॅरेंटिंगवर देखील भाष्य केलं. तो म्हणाला, ”मुलाला एकट्यानं सांभाळणं खरचं खूप कठीण होतं माझ्यासाठी. मुलांना मोठं करण्यात महिलांचा खूप मोठा वाटा असतो हे मला मनापासून पटलंय आता. त्या खूप धैर्यवान आणि धीराच्या असतात. मी तसं बनण्याचा प्रयत्न केला. पण कितीतरी वेळा माझा समतोल ढासळायचा. मी सगळं करता-करता कोलमडून जायचो. मी माझ्या मुलाची आई आणि बाप दोन्ही बनायचा प्रयत्न केला. मी जेव्हा मुलाच्या शाळेत मीटिंगसाठी जायचो तेव्हा जास्त मुलांच्या आईच यायच्या. एखाद दुसरा पुरुष दिसायचा,पण त्यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील असायची. त्यामुळे मला खूप असुरक्षित,एकटेपणा जाणवू लागला होता”.

राहूल देवच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर, ‘चॅम्पियन’,’ओमकारा’,’तोरबाज’, ‘रात बाकी है’… अशा अनेक सिनेमांतून त्यानं काम केलं आहे. याव्यतिरिक्त त्याने ‘देवों के देव…महादेव’ मध्येही काम केलंय. तो आता कन्नड सिनेमा ‘कब्जा’ मध्ये किच्चा सुदीप आणि उपेंद्र सोबत दिसणार आहे. या सिनेमाला आर चंद्रुने लिहिलं आहे आणि दिग्दर्शित केलं आहे. या सिनेमात श्रिया सरन महत्त्वाच्या भूमिकेत आहे.