UNGA : ‘शांततेबद्दल बोलून दहशतवाद पसरवणं हे तुमचं काम’; पाकिस्तानच्या आरोपांवर भारताचा पलटवार

UNGA : ‘शांततेबद्दल बोलून दहशतवाद पसरवणं हे तुमचं काम’; पाकिस्तानच्या आरोपांवर भारताचा पलटवार

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत (United Nations General Assembly) आज भारतानं पाकिस्तानच्या (India vs Pakistan) खोट्या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिलं. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या मिशनचे प्रथम सेक्रेटरी मिजितो विनिटो (Mijito Vinito) यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतावर खोटे आरोप केले, हे खेदजनक असल्याचं म्हटलंय.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या देशात सुरू असलेले गैरप्रकार लपवण्यासाठी या व्यासपीठाचा उघडपणे गैरवापर केलाय. जो देश आपल्याला आपल्या शेजाऱ्यांसोबत शांतता हवीय असा दावा करतो, तो कधीही सीमेपलीकडील दहशतवादाला प्रोत्साहित करणार नाही किंवा मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या (Mumbai Terror Attack) सूत्रधारांना आश्रय देणार नाही, असं त्यांनी पाकिस्तानला सुनावलं.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ (Pakistan PM Shehbaz Sharif) यांनी या मंचावरून भारताला लक्ष केलंय. युद्ध हा काही उपाय नाही. शांततापूर्ण संवादानंच काश्मीर प्रश्न सुटू शकतो, असं त्यांनी म्हटलं होतं. त्याला भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

भारतावर खोटे आरोप करण्याआधी पाकिस्ताननं स्वतःच्या काळ्या कारभाराचं स्पष्टीकरण द्यावं. जम्मू-काश्मीरवर दावा करण्याऐवजी इस्लामाबादनं सीमेपलीकडील दहशतवाद थांबवावा, असा सल्ला विनिटो यांनी पाकिस्तानला दिलाय. विनितो पुढं म्हणाले, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरूच आहेत. अल्पसंख्याक समाजातील हजारो तरुणींचं अपहरण केलं जात आहे. पाकिस्तानात हिंदू, शीख आणि ख्रिश्चन कुटुंबातील मुलींचं बळजबरीनं अपहरण केलं जातं, त्यांचं लग्न केलं जातं आणि नंतर धर्मांतर करायला भाग पाडलं जातं. जगातील इतर देशांनी याची दखल घेतली पाहिजे. मानवी हक्कांबद्दल, अल्पसंख्याकांच्या हक्कांबद्दल आणि मूलभूत शालीनतेबद्दल ही चिंतेची बाब आहे, असंही विनितो यांनी स्पष्ट केलं.